उल्हासनगर पोलीस उपायुक्त कार्यालयात VMS प्रणाली जनतेसाठी सक्रिय

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 कार्यालयात जनतेच्या सोयीसाठी आणि कार्यालयीन पारदर्शकता वाढवण्यासाठी Visitor System Management (VMS) प्रणाली अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीचा उद्देश कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या भेटींची नोंद सुरक्षित आणि संगणकीकृत स्वरूपात ठेवणे हा आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना पोलीस उपायुक्त कार्यालयात भेट देताना डिजिटल नोंदणी करता येणार असून, त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व कार्यक्षम होणार आहे. नवीन प्रणालीमुळे भेटींचा रेकॉर्ड व्यवस्थीतपणे जतन केला जाईल आणि कार्यालयीन वेळ व प्रशासनिक शिस्त टिकवून ठेवण्यात मदत होणार आहे.
श्री. सचिन शालिनी पांडुरंग गोरे, पोलीस उपायुक्त (उल्हासनगर परिमंडळ 4) यांनी सांगितले की, “सुरक्षा आणि सेवा हे पोलीस विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. VMS प्रणालीमुळे नागरिकांचे व पोलीस प्रशासनाचे परस्पर संबंध अधिक विश्वासार्ह बनतील. ही प्रणाली कार्यालयीन कामकाजात नवे तंत्रज्ञान वापरून कार्यक्षमतेत वाढ करण्याचा एक भाग आहे.
VMS प्रणालीत नागरिकांना कार्यालयात येताना ओळखपत्रासह स्वतःची नोंद करावी लागेल. त्यानंतर त्यांना डिजिटल टोकन किंवा भेटीचा क्रमांक दिला जाईल. भेट पूर्ण झाल्यानंतर ती नोंद सिस्टममध्ये संग्रहित केली जाईल. या उपक्रमामुळे पोलीस कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची योग्य माहिती उपलब्ध होईल, तसेच अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश टाळता येईल. ही प्रणाली संपूर्णपणे गोपनीयता आणि माहिती सुरक्षा यांची पूर्ण काळजी घेऊन राबवली जात आहे.
हा उपक्रम उल्हासनगर पोलिसांसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, नागरिकांना जलद सेवा आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात मदत करणार आहे.

Scroll to Top