
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडळ 4, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे च्या हद्दी पुन्हा एकदा देहव्यापाराचा काळा धंदा उघडकीस आला आहे. क्राइम ब्रँचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) कॅम्प 4, मधील इंडस्ट्रियल एरियातील सूर्या लॉजवर छापा टाकत एक मोठा सेक्स रॅकेट उध्वस्त केलं. या कारवाईत दोन असहाय मुलींची सुटका करण्यात आली असून, लॉजचा चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती वैशाली गोर्डे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी अतिशय नियोजनपूर्वक सापळा रचत लॉजवर छापा टाकला. यावेळी लॉजचा मॅनेजर देहव्यापारात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलींना तत्काळ सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आलं असून, त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे संबंधित कलम आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिकांमध्ये या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या लॉजमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याबाबत याआधीही काही स्थानिक वृत्तपत्रांनी वारंवार प्रकाश टाकला होता. मात्र, अखेर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत या बेकायदेशीर धंद्याला आळा घातला आहे.
उल्हासनगरमध्ये वाढत्या मानवी तस्करी आणि देहव्यापाराच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात पोलिसांकडून सुरू असलेली ही कायदेशीर लढाई अधिक तीव्र होणार, असा विश्वास पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.