झाडे खिळे-लायटिंग मुक्त अभियान राबवा

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : ®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : शहरातील नूतन इमारती, दुकाने, मॉल, डी-मार्ट, टोल नाके, मुख्य रस्ते व रिसॉर्ट परिसरात झाडांवर जाहिरातींसाठी खिळे ठोकणे, लायटिंगच्या तारा गुंडाळणे आणि सजावटीसाठी लाईट्स लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे झाडांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, झाडांच्या सालीवर खिळे ठोकल्याने आणि तारा घट्ट बांधल्याने झाडांच्या आतील प्रवाहवाहक ऊतकांवर (xylem, phloem) परिणाम होतो. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते, संसर्गाचा धोका वाढतो आणि झाडे कोमेजण्याची शक्यता निर्माण होते. झाडांवर रात्रीभर लायटिंग ठेवल्याने त्यांच्या नैसर्गिक दिवस-रात्र चक्रात व्यत्यय येतो. झाडांवर आश्रय घेणाऱ्या पक्षी, कीटक आणि लहान प्राण्यांच्या निवासावरही याचा विपरीत परिणाम होतो.
स्थानिक कायद्यांनुसार झाडांचे नुकसान करणे दंडनीय असूनही हा प्रकार सर्रास सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेने झाडांवर खिळे ठोकणे किंवा लायटिंग लावल्यास प्रति झाड ₹10,000 दंड आकारण्याची कारवाई करतात. ठाणे जिल्हयामध्येही अशाच प्रकारे कठोर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.
नागरिकांनी नगरपालिका-महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण (Tree Authority) आणि संबंधित प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून अशा झाडांची नोंद घ्यावी, जबाबदार दुकानदार, व्यावसायिक व इमारतधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच त्वरित खिळे व लायटिंग काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील झाडांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. “झाडे सजावटीची साधने नसून शहराचा श्वास आहेत. त्यांना होणारी हानी थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत,” असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Scroll to Top