बदलापूर : दलाल महिला अटक, दोन पीडित मुलींची सुटका

®अधिवेशन वृत्तसेवा/बदलापूर (दि. 18 नोव्हेंबर 2025) : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बदलापूर पश्चिम परिसरातील हॉटेल आराधना येथे सापळा रचून एक दलाल महिलेला अटक केली असून तिच्या ताब्यातून दोन असहाय्य मुलींची सुटका करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली गोरडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. हॉटेल आराधना, पहिला मजला, देवधर मार्केट, स्टेशन रोड, बदलापूर पश्चिम येथे आरोपी महिला काही असहाय्य मुलींना फुस लावून वेश्याव्यवसायासाठी आणणार असल्याची खबर मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ पाळत ठेवत सापळा लावला. कारवाई दरम्यान दलाल महिलेला ताब्यात घेण्यात आले तसेच तिच्या रक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 368/2025 भादंवि कलम 143(1), 143(3), 3(5) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात वपोनि/ वैशाली गोरडे, श्रे.पो.उपनि/ वालगुडे, श्रे.पो.उपनि/ क्षिरसागर, पोहवा व्ही.आर. पाटील, पोहवा के.बी. पाटील, मपोहवा भगत, मपोअंम थोरात व चापोअंम अहिरे यांनी सहभाग घेतला.पोलीस कक्षाच्या तत्पर कारवाईमुळे आणखी एका अनैतिक मानवी तस्करीच्या प्रकरणाला आळा बसला आहे.

Scroll to Top