
®अधिवेशन पब्लिकेशन, कल्याण : महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२५ दरम्यान पुरवणी मागण्यांवरील चर्चेत कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा, स्वच्छता, पुनर्वसन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक ज्वलंत प्रश्न आमदार सुल्भा गणपत गायकवाड यांनी सभागृहात उपस्थित केले. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
कल्याण (पूर्व) येथील विठ्ठलवाडी परिसरातील नाल्यावर असलेला अरुंद पूल पावसाळ्यात गंभीर समस्या ठरत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. अपुऱ्या पाणीनिचऱ्यामुळे पावसाचे पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये शिरत असून नागरिकांना दरवर्षी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विठ्ठलवाडी येथील नाल्यावर नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कार्यरत सुमारे १,५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन थकीत असल्याचा मुद्दाही सभागृहात मांडण्यात आला. या कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवण्यासाठी थकीत मानधन त्वरित अदा करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून तेथे बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड तयार झाल्याने परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, येथील कचरा उचलण्यासाठी नवीन टेंडरला तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.
महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे पुनर्वसन तातडीने सुरू करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी सभागृहात केली. शहर व ग्रामीण भागात वाढती पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता कालबाह्य झालेले जलशुद्धीकरण प्रकल्प बदलून नवीन प्रकल्प उभारणे, नवीन डीआय (DI) पाईपलाईन बसविणे तसेच स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण व प्रामाणिक पाठपुरावा पुढेही सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.