पोलीस ठाण्याची शिस्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यपद्धती – नागरिकांना कशी जाणवते?

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हानगर : एखाद्या पोलीस ठाण्याची शिस्त, व्यवस्था आणि कामकाज पाहिल्यावर त्या ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यपद्धती किती प्रभावी आहे हे सहज लक्षात येते. नागरिक पोलीस ठाण्यात प्रवेश करताच अनेक गोष्टींच्या आधारे त्या ठाण्याची गुणवत्ता आणि शिस्तबद्धता जाणवते.
पोलीस ठाण्यात प्रवेश करताना सर्वप्रथम दिसणारे फलक, माहिती बोर्ड आणि मार्गदर्शक सूचना व्यवस्थित असणे महत्त्वाचे असते. तक्रारदारांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच दिव्यांग व्यक्तींना सहज प्रवेश मिळेल अशी व्यवस्था असल्यास ते पोलीस ठाणे नागरिकाभिमुख असल्याचे दिसून येते.
तसेच प्रत्येक तपास कक्षावर ओळख फलक, तपास अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक लावलेले असणे पारदर्शकतेचे प्रतीक मानले जाते. लेखी तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाते का, जखमी व्यक्तींना त्वरित वाहन किंवा मदत मिळते का, तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई वेळेवर केली जाते का यावरूनही त्या पोलीस ठाण्याची कार्यक्षमता लक्षात येते.
पोलीस कर्मचारी गणवेशात आहेत का, नियमित पेट्रोलिंग होते का, तसेच स्वागत कक्षात येणाऱ्या नागरिकांची व्यवस्थित नोंद केली जाते का हे देखील महत्त्वाचे घटक आहेत.
याशिवाय पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही देखरेख, स्वच्छता, शिस्त आणि पत्रकार, समाजसेवक व पोलीस मित्र यांच्याशी असलेले सकारात्मक संबंध यावरूनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक किती शिस्तप्रिय आणि जबाबदार आहेत याचा अंदाज येतो.
म्हणूनच, पोलीस ठाण्याची व्यवस्था ही केवळ इमारतीची नसून नागरिकांशी असलेल्या संवादाची, सेवा भावनेची आणि प्रशासनातील शिस्तीची ओळख असते. योग्य नेतृत्व असल्यास पोलीस ठाणे हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी विश्वासाचे केंद्र बनते.

Scroll to Top