उल्हासनगर मध्ये पिण्याचे पाणी किती स्वच्छ; रोगराईला जबाबदार कोण?

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : कॅम्प 4 येथील महादेव नगर, प्रभाग क्रमांक 15 परिसरात पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागात अनेक दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त व अशुद्ध पाणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, पाण्याच्या लाईनमधून येणाऱ्या पाण्यात गाळ व घाण मिसळलेली असून काही वेळा पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट दिसून येते. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना जलजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थेची नियमित तपासणी होत नसल्याचा आरोप नागरिक करत असून जुन्या व गळती झालेल्या पाइपलाईनमुळे पाणी दूषित होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात व नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Scroll to Top