जिल्ह्यातील सर्वाधिक प्रश्न मांडणारे आमदार विनोद निकोले यांच्या नावाची नोंद

मुंबई / पालघर / डहाणू. (प्रतिनिधी) – 14 वी विधानसभा येत्या नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होणार असून सन 2019 ते 2024 या पंचवार्षिक काळात विधिमंडळाचे एकूण 12 अधिवेशने पार पडली या अधिवेशनात राज्यातील आमदारांनी 5921 प्रश्न सभागृहात मांडले. त्यापैकी एकूण 237 प्रश्न हे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी मांडून पालघर जिल्ह्यात सर्वाधिक प्रश्न मांडत अव्वल स्थान पटकावले असल्याचे ‘संपर्क’ या संस्थेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.  तर राज्यातील विधानसभेच्या 288 आमदारांमध्ये प्रश्न विचारणाऱ्या आमदारांत त्यांचा सातवा क्रमांक येतो. मुंबईस्थित ‘संपर्क’ या धोरणविषयक अभ्यास व पाठपुरावा करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाचे विश्लेषण केले. नुकतेच याबाबतचे अहवाल त्यांनी प्रकाशित केला आहे. त्यानुसार सन 2019 ते 2024 या काळातील विधिमंडळातील 12 अधिवेशनात 131 दिवसांच्या कामकाजात उपस्थित केले गेलेल्या तारांकित प्रश्न व लक्षवेधी सूचना या माहितीचे विश्लेषण अहवालात करण्यात आले आहे. 14 व्या विधानसभेत कोविडमुळे 03 अधिवेशने रद्द केली गेली. सन 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या रहित केला गेला. या विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची संधी मागील विधानसभेच्या तुलनेत आमदारांना कमी मिळाली. राज्यातील वांद्रे पश्चिम चे आमदार आशिष शेलार यांनी बालक विषयी 28 प्रश्न तर आरोग्य विषयासंदर्भातील सर्वाधिक 82 प्रश्न मांडले तर अमीन पटेल यांनी महिला विषयक 21 आणि शिक्षक विषय 45 प्रश्न मांडले तर डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी आदिवासी विषयक सर्वाधिक 21 प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यातील विविध आमदारांनी सर्वसाधारण एकूण 5921 तारांकित प्रश्न उपस्थित केले, तर 2130 लक्षवेधी सूचना मांडल्या. राज्यात पहिल्या क्रमांकावर आमदार अमीन पटेल यांनी 656 तारांकित प्रश्न मांडले. तर दुसरा क्रमांक आ. आशिष शेलार यांनी 630, तर तिसऱ्या क्रमांकावर आ. असलम शेख यांनी 532, तर चौथ्या क्रमांकावर आ. मनीषा चौधरी यांनी 459, पाचव्या क्रमांकावर आ. कुणाल पाटील यांनी 357, तर सहाव्या क्रमांकावर आ. प्रतिभा धानोरकर यांनी 316 तर आमदार विनोद निकोले यांनी 237 पैकी 21 आदिवासींबाबत प्रश्न मांडले आहेत. यावरून असे सिद्ध होते की, पालघर जिल्ह्यात देखील सर्वाधिक तारांकित प्रश्न आमदार विनोद निकोले यांनी मांडून अव्वल क्रमांक पटकावला आहे. ★★★★★

Scroll to Top